
पालघर, 31 मार्च, (हिं.स.) पालघर जिल्ह्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेची प्रभावी सुरुवात दिनांक 28 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, ऐना येथे करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी व तालुका आरोग्य अधिकारी, वसई डॉ. ऋग्वेद दुधात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रानशेत (कोंपाडा) येथील 14 वर्षीय हर्षला वंशा काठ्या हिला LHV निलिमा उराडे यांच्या हस्ते HPV लस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुलीचे पालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, ज्यामुळे पालकांचा विश्वास आणि सहभाग अधोरेखित झाला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा पाटील यांनी HPV संसर्ग व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी या लसीचे महत्त्व, सुरक्षितता आणि भविष्यातील आरोग्य संरक्षणातील भूमिका याविषयी उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाअंतर्गत 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींच्या पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत HPV लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच पालक व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
किशोरवयीन मुलींमध्ये HPV लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करून भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL