
पालघर, 31 मार्च (हिं.स.)।पालघर नगरपरिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्समधून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रेडिएशन उत्सर्जन होत असल्याची भीती व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर सर्व टॉवर्सचे तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी पुढे आली आहे. नगरसेवक ऍड. धर्मद्र भट यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
नगरपरिषद हद्दीत विविध दूरसंचार कंपन्यांचे अनेक मोबाइल टॉवर्स कार्यरत आहेत. यापैकी काही टॉवर्स अनधिकृतरीत्या उभारण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. या टॉवर्समधून होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक रेडिएशनचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दूरसंचार विभागाने मोबाइल टॉवर्समधून होणाऱ्या रेडिएशनसाठी विशिष्ट मर्यादा आणि तांत्रिक निकष निश्चित केले आहेत. या नियमांचे पालन करणे सर्व कंपन्यांसाठी बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सक्षम तांत्रिक यंत्रणेमार्फत सर्व टॉवर्सची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तपासणीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रेडिएशन उत्सर्जन आढळल्यास संबंधित कंपन्यांविरोधात शासन निर्णयानुसार कठोर कारवाई करावी, तसेच अशा टॉवर्सना हटविण्याची कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, वाढत्या शहरीकरणामुळे मोबाइल नेटवर्कची गरज वाढत असली तरी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत पारदर्शक तपासणी प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL