
परभणी, 31 मार्च (हिं.स.)। महानगरपालीकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत महानगरपालिकेचा 16.09 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. परंतु, महानगरपालिकेला आर्थिक शिस्त लागावी या दृष्टीने सर्वतोपरि उपाययोजना करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. तसेच लवकरच ई बस उपलब्ध होतील, अशी माहिती महापौर सय्यद इकबाल यांनी दिली.
वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ सभागृहात अर्थसंकल्पीय बैठक आयोजित करण्यात आली. महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी तर व्यासपीठावर उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर नगरसचिव विकास रत्नपारखे प्रभारी मुख्य लेखा अधिकारी अमोल सोळंके विराजमान होते. या सभेमध्ये आयुक्त नितीन नार्वेकर यांनी महानगरपालिकेचे सन 2025-26 चे सुधारित व साल सन 2026-2027 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. स्थायी समिती अस्तित्वात न आल्यामुळे व अर्थसंकल्पात 31 मार्च पूर्वी मान्यता घेणे आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 35- अ चा वापर करून आज हा अर्थसंकल्प सर्व साधारण सभे समोर ठेवलेला आहे, असे आयुक्त नार्वेकर यांनी नमूद केले.
सन 2026-26 चे सुधारीत व सन 2026 -27 चे जमा व खर्चाचे अंदाजपत्रक एकुण जमा रू. 773.19 कोटी, प्रशासनाकडून विकासकामे व योजनेच्या खर्चाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. सन 2025-26 मध्ये अंदाजपत्रकात प्रस्तावीत केलेला निधी या आर्थिक वर्षात पुरेशा प्रमाणत प्राप्त न झाल्यामुळे सन 2026-27 मध्ये जास्तीचा आहे. प्रस्तावीत करण्यात आलेला निधी प्रशासनीक स्तरावर पाठपुरावा करून प्राप्त करून घेण्यात येईल. त्या अनुषंगाने तुलनात्मक दृष्टया पहाता सन 2026-27 चे सुधारीत अंदाजपत्रक हे सन 2025 -26 च्या तुलनेत अधिकच्या रक्कमेचे झालेले आहे, असे म्हटले. अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये सभागृह नेते सय्यद शमी ऊर्फ माजुलाला, गटनेते दिलीप ठाकुर , गुलमीर खान, विजय जामकर, सुनिल देशमुख, नदीम इनामदार, शाम खोबे, सागर गंगाळे, अक्षय देशमुख, रितश जैन,गणेश टाक, आर्जुन सामाले, शरुफुदीन सिदीकी, श्रीमती सपना जुपटे, मिलींद बामनिकर, आदींनी अर्थसंकल्पीय सभेसाठी सहभाग घेतला.मालमत्ता करात कोणतीही वाढ नाही... यावेळी आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामध्ये शहरवासीयांसाठी मालमत्ताकरामध्ये कुठलीही करवाढ केलेली नाही. अनधिकृत बांधकाम शास्ती करामध्ये सुट देण्यात आली आहे. तसेच स्वच्छता करामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु, या वर्षीपासून थकीत कर मोठ्या प्रमाणावर वसूल व्हावा, कर वसूलीत नियमितता यावी यासाठी सर्वतोपरि प्रयत्न केले जातील, असे म्हटले.70 सेवा लवकरच ऑनलाईनद्वारे..नागरिकांना सुविधा मिळाव्यात याकरिता महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणार्या विविध प्रकारच्या 70 सेवा या लवकरच ऑलनलाईन दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना आपआपल्या मोबाईलद्वारे व संगणकाद्वारे त्या सेवा प्राप्त होणार आहेत. त्यामुळे वेळ व खर्चातही मोठी बचत होणार आहे. नागरीकांचा त्रास कमी होईल, असे आयुक्त नार्वेकर यांनी म्हटले.महत्वाकांक्षी योजनांच्या निविदा अंतीम टप्प्यात.. महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेसह घनकचरा व्यवस्थापना संदर्भातील निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. त्याद्वारे शहरांतर्गत कचरा संकलनासह बायोमॅट्रिक साठलेला कचरा शून्यावर आणण्यासह अन्य गोष्टीही सुलभपणे करता येणार आहेत. शासनाने मंजुर केलेली भूमिगत गटार योजना निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. लवकरच तिला मान्यता देवून प्रत्येक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. 21.98 कोटी रूपयांची समांतर पाणी पुरवठा योजनाही कार्यान्वित केली जाणार आहे. ज्यामुळे शहराची भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेता त्या दिशेने पुरवठा करणे सोपे होणार आहे.केंद्र सरकारद्वारे ई-बसेस उपलब्ध होणारशहरवासियांकरिता केंद्र सरकारच्या सहाय्यातून ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्या संबंधिची प्रक्रिया ही अंतीम टप्प्यात आहे. या बसेस उपलब्ध झाल्याबरोबर नागरीकांना शहर बस वाहतूकीची सुविधा उपलब्ध होईल.अर्थसंकल्पात सर्व गोष्टींचा विचार - महापौर परभणी शहरातील दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, रस्ते विकास दैनंदिन पाणी पुरवठा देखभाल दुरूस्ती, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सुविधा इ. सर्व नागरी तथा आवश्यक सुविधांची पुर्तता करतांना समतोल विकासाचा विचार करण्यात आला आहे. शहरातील सर्व समाज स्तरांमधील बालके, नवतरूण, महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना व समाजातील सर्व घटकांना दर्जात्मक आवश्यक मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी ही महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे, अशी माहिती महापौर सय्यद इकबाल यांनी दिली.स्वनिधीत काही वाढ होईना...महानगरपालिकेत अनेक विकास कामे ही मनपा स्वनिधीमधून करणे अत्यावश्यक असतात. परंतु कमकुवत स्वनिधीच्या सर्व बाबींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रतिकूल परिणाम या महानगरपालिकेच्या स्वउत्पन्नामधून करण्यात येणा-या विकास कामांवर झाला आहे, अशी महिती आयुक्त नार्वेकर यांनी दिली.उद्याने सुशोभिकरणाकरीता पावणे दोन कोटी...महानगरपालिके द्वारा संचालीत उयाने व हरीत क्षेत्रे यांचे देखभाली करीता नविन हरित क्षेत्र, उद्याने शुशोभिकरण, वृक्षारोपण व संगोपन तरतूद करण्यात आली आहे. याकरीता रु 1.70 कोटी तरतूद करण्यात आली आहे.भूसंपादनाकरीता 3 कोटी रुपयांची तरतूद..परभणी शहराच्या मंजुर विकास योजनेमधील विविध आरक्षणे विकसित करणे तसेच विविध विकास कामांकरीता भूसंपादन करणे आवश्यक असते. सदर भूसंपादनाकरीता रु 3 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.कर वसूली व अनुदान प्राप्तीवर लक्ष केंद्रीत करणार...मोठे क्षेत्रफळ असलेल्या या महानगरपालिकेस विकास करण्यास वाव असून त्यासाठी उत्पन्नाची बाजु बळकट करूनच शाश्वत विकास शक्य आहे. आगामी वर्षात संकलीत कराची आकारणी करून वसुली करणे, इतर उत्पन्नाची साधने निर्माण करून बळकट करणे, शासनाकडे अनुदाने मिळण्यासाठी पाठपुरावा करून अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त नार्वेकर यांनी दिली.नवनिर्वाचित सदस्यांचा मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त.... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय जामकर यांनी सदस्यांना विश्वासात न घेता बजेट सादर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर भारतीय जनता पार्टीचे रितेश जैन, गणेश टाक यांनी सदस्यांच्या लेखी पत्राला देखील उत्तरे मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. सदस्या सौ. गिरीजा शंकर आजेगावकर यांनी दर चार दिवसाला व फक्त दोन तास पाणी पुरवठा करण्याची व रोहित्रे दुरुस्तीची मागणी केली. त्याकडे होणार्या दुर्लक्षाबद्दल खंत व्यक्त केली. गटनेते दिलीप ठाकुर यांनी नगरसेवकांचा स्वेच्छा वाढवावा, मिलींद बामनीकर यांनी नटराज रंग मंदिराचे पुनर्जीवन करावे, तर जेष्ठ सदस्य गुलमीरखान व सुनिल देशमुख यांनी पालिकेच्या स्व निधीतून नटराज रंग मंदिरास पुनर्वेभव प्राप्त करुन द्यावे, असे म्हटले. अक्षय देशमुख यांनी पालिकेची उद्याने भाडेतत्वावर देऊ नयेत, असे म्हटले. तर व्यंकट डहाळे यांनी नाल्यावर ढापे टाकण्यासाठी पाच कोटीची तरतुद करण्याची मागणी केली. परभणी शहरामध्ये श्वानांचे निरजंतुकीकरण करण्यासाठी पथक नियुक्ती केले आहे. निरजंतुकीकरण करणांची गती वाढवावी, अशी मागणी व्यंकट डहाळे केली. मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करण्यासाठी पथक वाढवावीत, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis