
अमरावती, 31 मार्च (हिं.स.) : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय आमसभेत सोमवारी पश्चिम भागाच्या विकासासाठी विशेष निधीच्या मागणीवरून मोठा गोंधळ उडाला. एमआयएमच्या नगरसेवकांनी सभापतींच्या आसनासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली, तर काँग्रेसनेही त्यांच्या मागणीला समर्थन दिले. सत्ताधारी महायुतीने या मागणीला तीव्र विरोध केल्याने काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. अर्थसंकल्पावरील चर्चा अंतिम टप्प्यात असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रतिनिधित्वातील पश्चिम भागाचा विकास झालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. या भागासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची त्यांनी जोरदार मागणी केली.
काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावत यांनी या मागणीला पाठिंबा देत निधी देण्याची सूचना केली. मात्र, सभागृहनेते चेतन गावंडे यांनी नियमानुसार असा विशेष निधी देता येणार नसल्याचे स्पष्ट करत विरोध दर्शविला. सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरण तापले.
यानंतर विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी पश्चिम भागातील विकासाच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर सभागृहातील गोंधळ शांत झाला.
दरम्यान, कोणार्क कंपनीच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीबाबतही चर्चा झाली असून ही बैठक 4 एप्रिल रोजी होणार आहे.
पदाधिकारी व नगरसेवक निधीत वाढ
अर्थसंकल्पात विविध पदाधिकाऱ्यांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. महापौरांना 1.5 कोटी, उपमहापौरांना 1 कोटी, स्थायी समिती सभापती, पक्षनेते व विरोधी पक्षनेते यांना प्रत्येकी 75 लाख, गटनेत्यांना 40 लाख, तर झोन सभापतींना 20 लाख निधी देण्यात येणार आहे. प्रत्येक नगरसेवकाला वार्ड विकास व स्वेच्छा निधी मिळून 40 लाख मिळणार असून प्रत्येक प्रभागासाठी एकूण 1.60 कोटींचा विकास निधी उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, महापौर महोत्सवासाठी 35 लाख आणि नाट्य, कला व क्रीडा महोत्सवासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
एकूण ८७६.२६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 876.26 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यामध्ये 711.6 कोटी खर्च प्रस्तावित असून वर्षाअखेरीस 165.20 कोटी शिल्लक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. सविस्तर चर्चेनंतर काही बदलांसह अर्थसंकल्पास सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी