
मुंबई, 31 मार्च (हिं.स.)।
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऐतिहासिक 'पंजाब मेल' (ट्रेन क्रमांक 12137/12138) चा 'ट्रेन महोत्सव' साजरा केला.
या कार्यक्रमात प्रवासी, रेल्वे अधिकारी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला; भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक गाड्यांपैकी एक असलेल्या 'पंजाब मेल'चा समृद्ध वारसा साजरा करण्यासाठी हे सर्वजण येथे एकत्र आले होते.
*कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये-*
ट्रेन सुटण्याच्या नियोजित वेळेच्या एक तास आधी १८.३५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंजाब मेलला वारसा- थीम असलेल्या डिझाइन आणि व्हिज्युअल्सने सुंदरपणे सजवण्यात आले होते, जे तिचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवत होते. भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेल्या पंजाब मेलचा गौरवशाली प्रवास दर्शवणाऱ्या एका आकर्षक दृकश्राव्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि भारतीय रेल्वेसाठी दिलेल्या तिच्या अग्रगण्य योगदानावर प्रकाश टाकला.
*सुधारित सुविधांचे प्रदर्शन*
रेल्वे महोत्सवाचा भाग म्हणून, पंजाब मेलमध्ये प्रवाशांचा आराम वाढवण्यासाठी आणि तिचे ऐतिहासिक आकर्षण जपण्यासाठी महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे:
* अंतर्गत सजावट (प्रथम वातानुकूलित): - उत्कृष्ट सौंदर्यासाठी कूपे आणि ऑयल पॅनेलवर विनाइल रॅपिंग.
* बाह्य ब्रँडिंग: - प्रथम वातानुकूलित – द्वितीय वातानुकूलित संयुक्त कोच आणि पॅन्ट्री कारवर वारसा-थीम असलेल्या चित्रांसह विनाइल रॅपिंग.
* सांस्कृतिक एकात्मता: - पंजाब मेलचा १९१२ चा वारसा, महाराष्ट्र-पंजाब संबंध आणि स्वातंत्र्य लढ्याशी असलेला संबंध दर्शवणारी रचना; ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिराचे स्क्रीन प्रिंट्स आहेत.
* वारसा प्रतिमा: - वातानुकूलित डब्यांमध्ये वॉटरप्रूफ कॅनव्हास प्रिंट्स, ज्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो.
* प्रवाशांना आराम: - सर्व वातानुकूलित डब्यांमध्ये नवीन पडदे लावण्यात आले आहेत.
* स्वच्छतेतील सुधारणा: - ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेंसर, सुधारित बिब कॉक, सोप डिस्पेंसर, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती आणि स्क्रॅपर मॅट्सची तरतूद.
* सामायिक जागा: - अधिक टिकाऊपणासाठी गँगवे, दरवाजे आणि स्वच्छतागृहांमध्ये विनाइल रॅपिंग.
* फलक: - सर्व डब्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी वारसा-थीम असलेले फलक.
* फायनल टच: - सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्जवर रंगाचा टच-अप.
*ऐतिहासिक वारसा*
पंजाब मेल, जी मूळतः पंजाब लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ती प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांहून अधिक जुनी आहे.
बॅलार्ड पिअर मोल स्टेशन एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे सेवांसाठी एक प्रमुख केंद्र होते, जिथून पंजाब मेलचा प्रवास सुरू होत असे. दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल येथून या गाडीने आपला पहिला प्रवास सुरू केला. अनेक दशकांपासून, प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला हा प्रवास मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे.
*वारसा महत्त्व*
'पंजाब मेल' ही केवळ एक रेल्वेगाडी नाही; तर तो एक जिवंत वारसा आहे, ज्याने पिढ्यानपिढ्या विविध प्रदेश, लोक आणि इतिहास यांना परस्परांशी जोडले आहे. आपल्या खोलवर रुजलेल्या वारशासह आणि सातत्याने होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे, परंपरा आणि आधुनिक प्रवासी सुविधा यांचा सुरेख मेळ घालण्याच्या 'मध्य रेल्वे'च्या कटिबद्धतेचे ती एक प्रतीक म्हणून उभी आहे.
या प्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. प्रतीक गोस्वामी, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. हिरेष मीना, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता श्री. सुबोध कुमार सागर, तसेच मुख्यालयातील व मुंबई विभागातील विविध विभागांचे प्रधान प्रमुख, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, रेल्वेप्रेमी आणि प्रवासी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर