
लातूर, 31 मार्च (हिं.स.) : अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाचा खेळाडू साईप्रसाद जंगवाड यांची १ ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान ब्राझीलमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅडेट वर्ल्ड तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साईप्रसाद यांनी यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बिहारमधील पटना येथे झालेल्या ‘युथ खेलो इंडिया’ तलवारबाजी स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्णपदके पटकावली होती. तसेच न्यूझीलंडमध्ये झालेल्या कॅडेट कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्यपदक जिंकून त्यांनी देशाचे नाव उज्वल केले आहे. याशिवाय बहरीन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून, २०२४-२५ या कालावधीत पाच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
यशवंत विद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय यश मिळवत शाळेची ओळख राज्यभर निर्माण केली आहे. साईप्रसाद यांच्या निवडीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
दरम्यान, विद्यालयातील ८ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ५ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवले आहे. तसेच २ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पात्रता मिळवत शाळेचा गौरव वाढवला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis