
अमरावती, 31 मार्च (हिं.स.) विदर्भातील शाळा पूर्वीप्रमाणे ३० जूनपासूनच सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षण संचालनालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ८ जून २००७ रोजी दिलेल्या आदेशानुसार विदर्भातील शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय अद्याप कायम असताना अलीकडे शिक्षण संचालनालयाने २८ मार्च रोजी विदर्भातील शाळाही १५ जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिल्याने शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार जून महिन्यात विदर्भात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात असते. ग्रामीण भागात वीजेचे भारनियमन, पाण्याची कमतरता आणि उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत आवश्यक सुविधा देणे कठीण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा ३० जूनपासून सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. उशिरा शाळा सुरू झाल्यास शैक्षणिक दिवसांवर कोणताही परिणाम होत नाही, कारण दिवाळी सुट्ट्यांमध्ये त्याची भरपाई होते, असेही समितीने स्पष्ट केले. तसेच मे-जून महिन्यात सुरू होणाऱ्या जनगणना कामात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती होत असल्याने शिक्षकांच्या सुट्ट्यांवरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २०२६-२७ शैक्षणिक वर्ष विदर्भात ३० जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी समितीची मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी