
पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। जिल्ह्यात सहा महिने मुबलक पाऊस पडूनही अनेक गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, ग्रामपंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून नागरिकांना कडक उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मोखाडा तालुक्यातील १२ गावपाड्यांमध्ये ३,३६४ नागरिक व १,२२३ पशुधनासाठी सहा टँकरद्वारे दररोज सुमारे ११.५ फेऱ्या केल्या जात आहेत. तर जव्हार तालुक्यात चार गावे व सहा पाड्यांतील ५,३२६ नागरिक आणि २,८८६ पशुधनासाठी पाच टँकरद्वारे १४ फेऱ्यांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. वाडा तालुक्यातील ओगदा, टणावे, टोकरेपाडा, जांभळपाडा, सागमाळ आदी भागांमध्ये १,१८६ नागरिक व ५२६ पशुधनासाठी दोन टँकरद्वारे केवळ ३.३३ फेऱ्या होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत टँकरवर अवलंबून असलेल्या गावपाड्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. आधी १५ गावपाड्यांना पाणीपुरवठा होत होता; आता पाच गावे आणि २४ पाड्यांसह एकूण १४,८११ लोकसंख्येला १३ टँकरद्वारे दररोज २९ फेऱ्यांमधून पाणी दिले जात आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतींकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकर मंजुरीसाठी प्रस्ताव वेळेत न पाठवल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL