नांदेड -शीतलादेवी (पोचम्मा) यात्रोत्सवास प्रारंभ
नांदेड, 31 मार्च (हिं.स.)। बारड येथील तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा व विदर्भातील जागृत देवस्थान तसेच भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शीतलादेवीच्या (पोचम्मादेवी) यात्रोत्सवाला उत्साहात सुरवात झाली आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मूर्त
नांदेड -शीतलादेवी (पोचम्मा) यात्रोत्सवास प्रारंभ


नांदेड, 31 मार्च (हिं.स.)। बारड येथील तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा व विदर्भातील जागृत देवस्थान तसेच भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शीतलादेवीच्या (पोचम्मादेवी) यात्रोत्सवाला उत्साहात सुरवात झाली आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा असून, कुस्त्यांची दंगलही रंगणार आहे.

पोचम्मादेवीचे मंदिर पुरातन काळातील भव्य वडाच्या झाडाखाली वसलेले आहे. शीतला मातेचे वास्तव्य विहिरीत असल्याचे सांगितले जाते. थोर स्वातंत्र्यसैनिक साहेबराव देशमुख बारडकर यांनी देवस्थानासाठी चार गुंठे जागा दान दिलेली आहे. दरवर्षी चैत्र-वैशाख पौर्णिमेला येथे यात्रा भरते. या निमित्ताने लाखो भक्त प्रथम चंद्रपूर येथील देवीचे दर्शन घेऊन नंतर शीतलादेवीचे दर्शन घेतात, अशी प्रथा रूढ आहे. चंद्रपूरच्या आईची धाकटी बहीण म्हणून पोचम्मादेवीची ओळख आहे. भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच जिल्ह्यातील भाविक नवस फेडण्यासाठी मनोभावे आराधना करतात. नवरात्र महोत्सवात ओटी भरण्यासाठी सुहासिनींची लगबग सुरू आहे. नवरात्र अष्टमीला तांबूल व दुधाचा प्रसाद वाटप केला जातो. संस्थांच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने शीतलादेवीची बैलगाडीतून आंबिल यात्रा काढण्याची पद्धत आहे.

दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त यात्रा महोत्सवात भव्य पालखी मिरवणूक काढली जाते. सुमारे शंभर वर्षांपूर्वी नागोबा कुंभार यांनी तयार केलेल्या आकर्षक लाकडी मूर्तीची गावातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात येते. यंदा गुरुवारी (ता.२) सायंकाळी सहाला मिरवणूक निघणार आहे.

यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (ता.तीन) दुपारी दोनला कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. पैलवानांसाठी पारितोषिके ठेवण्यात आली असून, प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ७हजार रुपये आहे. शिवाय, अनेक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande