
सोलापूर, 31 मार्च (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोलापूर शहरात ‘डीजे’साठी बंदी आहे. आतापर्यंत सर्वच मिरवणुका डीजेमुक्त निघाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुका देखील डीजेमुक्त निघतील. तत्पूर्वी, सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या पोलिस ठाण्यांमध्ये बैठका घेऊन त्यासंदर्भातील आवाहन केले जात आहे. कोणी डीजे बुकिंग केल्यास त्यांचे नुकसान होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे, असे सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सांगितले .
आवाजाची मर्यादा पाळून मंडळांना मिरवणुकीत चार स्पीकर लावता येतील. देखावे, सामाजिक उपक्रमांवर मंडळांनी खर्च करावा, जेणेकरून महिला, लहान मुले-मुलींना मिरवणुका पाहता येतील, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सवापासून सर्वच मिरवणुकांमध्ये डीजे दिसलेला नाही. ही प्रथा कोणीही मोडणार नाही, याची खबरदारी पोलिस घेत आहेत. त्यानुसार शहरातील सात पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अंमलबजावणी करीत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकाही डीजेमुक्त निघतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यांमधील बैठकांमध्ये सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड