
अमरावती, 31 मार्च (हिं.स.) | अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेतील प्रशासकीय राजवटीच्या काळात सुरू असलेल्या विकासकामांवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता शासकीय साहित्य चोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी कार्यालयाच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान मौल्यवान सागवान लाकडाचे कपाट, खिडक्या व गेट परस्पर कंत्राटदाराने लंपास केल्याचा आरोप पुढे आला असून, या प्रकरणामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा संशयाचे सावट दाटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू आहे. या काळात विविध विकासकामे हाती घेण्यात आली असली तरी त्यातील अनेक कामांच्या दर्जाबाबत नागरिकांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली आहे. निकृष्ट दर्जा, अपूर्ण कामे आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे नागरिकांचा रोष वाढत असतानाच आता थेट शासकीय मालमत्ता चोरीचा आरोप समोर आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारतीतील सागवान लाकडापासून तयार केलेले कपाट, खिडक्या तसेच लोखंडी गेट यांसारखे मौल्यवान साहित्य नियमानुसार शासकीय नोंदीत जमा करणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने हे साहित्य कोणतीही अधिकृत नोंद न करता परस्पर स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शंभू मालठाणे यांनी केला आहे. या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मालठाणे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करून संबंधित कंत्राटदारावर शासकीय मालमत्ता चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या प्रकारात सहकार्य करणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
दरम्यान, या आरोपांमुळे नगरपरिषद वर्तुळात खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “दुरुस्तीच्या नावाखाली साहित्य गायब होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने मात्र या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास अद्याप टाळाटाळ केली आहे. त्यामुळे संशय अधिकच बळावला असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र होत आहे. पारदर्शक कारभाराची अपेक्षा असताना अशा प्रकारचे आरोप समोर येणे हे प्रशासनासाठी लाजिरवाणे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात पुढील काही दिवसांत चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर वास्तव समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, जर आरोप खरे ठरले तर संबंधित कंत्राटदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे.एकूणच, अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेतील हा कथित ‘सागवान / भंगार ..घोटाळा’ केवळ चोरीपुरता मर्यादित नसून, प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान अंजनगाव सुर्जीचे नगरपरिषद अध्यक्ष अविनाश गायगोले म्हणाले की, सदर विषय हा प्रशासन कार्य काळामध्ये झालेला असल्यामुळे मी या बाबीची गंभीरतिने माहिती घेऊन तसेच चौकशी करण्याचे आदेश देतो व दोषी ठेकेदारावर कारवाई निश्चित केला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी