
लातूर, 31 मार्च (हिं.स.)। प्रतिवर्षांप्रमाणे यावर्षीही ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे सहाव्या राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.
होळकर वाडा या ठिकाणी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. या साहित्य संमेलनाचे कार्यवाहक प्राचार्य दत्तात्रय बारगळ हे आहेत. संयोजक बापूसाहेब शिंदे हे असून सदर संमेलन मार्गदर्शक व महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. संमेलनाचे उदघाटन आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी
उद्घाटन होईल. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खा. रामराव वडकुते, मध्यप्रदेशचे पालकमंत्री सैतान सिंग, माजी आमदार रामहरी रुपनवर, काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी सुधीरदास महाराज, माजी आ. हरिभाऊ भदे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सुभाष बोन्द्रे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन सोहळ्यात अनेक साहित्यिकांच्या ग्रंथांचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते होणार असल्याचे डॉ. टकले यांनी सांगितले. संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात चांदवडच्या जडणघडणीत होळकरांचे योगदान या विषयावर प्राचार्य दत्तात्रय बारगळ हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराजा यशवंतराव होळकर यांचे देशासाठी यो गदान या विषयावर प्रा.डॉ. मधुकर सलगरे यांचे व्याख्यान होईल तर धनगर जमातीची राजकीय स्थिती या विषयावर प्रा.डॉ. विजय शिरसाठ मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनाच्या चौथ्या सत्रात
सकाळी अकरा वाजता संमेलनाचे
प्रशांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनात राज्यभरातील मान्यवर कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. पाचव्या सत्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर एकपात्री नाटक सादर होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विविध परिसंवाद व चर्चासत्र होणार आहेत. यामध्ये धनगर समाजाची शैक्षणिक स्थिती या विषयावर प्राचार्य धोंडीराम गडदे आपले विचार व्यक्तकरणार आहेत. धनगर जमातीच्या मेंढपाळ व्यवसायाची स्थिती : काल, आज आणि उद्या या विषयावर चंद्रकांत हजारे मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची त्रिजन्म शताब्दी एक आढावा या विषयावर राम लांडे हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी प्रा.डॉ. मधुकर सलगरे, लक्ष्मण नजन यांचेही व्याख्यान होणार आहे. संमेलनाच्या समारोप सोहळ्यास माजी आ. बच्चूभाऊ कडू, डॉ. यशपाल भिंगे, आयपीएस अधिकारी बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ
पत्रकार दिलीप येडतकर, रेशमा पुणेकर . गणेश निंबाळकर, विनायक काळदाते आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.साहित्य संमेलनाच्या माध्यमातून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. टकले यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत हजारे, संभाजीराव सूळ, प्रा.डॉ. सलगरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी साहित्यिक उज्वलकुमार माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis