
परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य पुरस्कृत योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना अंतर्गत लाभार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) पडताळणी व आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बुधवारी (दि. १) सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कँम्पमध्ये सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी कार्ड पडताळणी व आधार प्रमाणीकरणासाठी मूळ युडीआयडी कार्ड, ऑनलाइन अपंगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड सोबत आणून तहसील कार्यालय, पाथरी येथील संजय गांधी निराधार योजना विभागात उपस्थित राहावे. लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) पडताळणी करून घ्यावी. तसेच आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक सोबत ठेवावा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या कॅम्पमध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन तहसिलदार पाथरी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis