
रत्नागिरी, 31 मार्च, (हिं. स.) : पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले. हल्लेखोरांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर झालेला हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे सांगत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तत्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या निवेदनाचा स्वीकार करून प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्रशासनाकडून पोलिसांना सखोल तपासाच्या सूचना दिल्या जातील आणि कायद्यानुसार कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी