
धुळे, 31 मार्च, (हिं.स.) - खान्देशासह पिंपळनेर, नंदुरबार, नवापूर, धुळे, जळगाव तसेच मध्यप्रदेश व गुजरात व विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक सप्तशृंगगडावर दाखल होत आहेत. अनेक पालख्या, दिंड्या व पायी चालत येणारे भाविक यामुळे गडावर भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळत आहे. काही पालखी दिंड्यांना ३० ते ४० वर्षांची परंपरा असून, भाविकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरत आहे.
उत्सव काळात भाविकांसाठी दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद), २४ तास खुले दर्शन, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व पानपोई, तसेच अग्निशमन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्ट, पोलिस, ग्रामपंचायत, महसूल व आपत्ती व्यवस्थापन पथक सतत कार्यरत आहेत.साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर भाविकांचा प्रचंड ओघ कायम असून, पंचामृत महापूजेनंतर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. गाभाऱ्यातील आकर्षक फुलसजावट, देवीला परिधान केलेले निळ्या रंगाचे भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकार यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. सकाळी ९.२५ वाजता दर्शनाची बारी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचल्याने गर्दीची तीव्रता स्पष्ट झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर