
युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती, ४ मार्च (हिं.स.) : सध्या सुरू असलेल्या आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेत शासनाने एक किलोमीटर अंतराची अट लागू केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. ही जाचक अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मागील वर्षी पाल्याच्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर तीन किलोमीटरपर्यंत मान्य होते. मात्र यंदा ही मर्यादा एक किलोमीटर करण्यात आल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ही अट शिक्षण हक्क कायद्याच्या भावनेला बाधा आणणारी असून ती तातडीने रद्द करावी. तसेच कोणतीही खासगी विनाअनुदानित शाळा केवळ अंतराच्या निकषावर आरटीई प्रवेशप्रक्रियेपासून वगळली जाणार नाही, याबाबत स्पष्ट आदेश जारी करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी रितेश पांडव, अनिकेत ढेंगळे, शैलेश काळपांडे, निवृत्ती वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवक काँग्रेसने शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी