
अमरावती, 04 मार्च (हिं.स.)
इराण-इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आखाती देशांतील हवाई सेवा विस्कळीत झाली आहेत. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. परिणामी हजारो लोकांचे मायदेशी परतणे अनिश्चित झाले आहे. अशातच अमरावतीमधील १२ जण दुबई तर २ जण अबुधाबी, असे १४ जण अडकले आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. तर खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्समार्फत गेलेले अमरावतीच्या खत्री कुटुंबियांतील दोघे दुबईमध्ये अडकले होते. मात्र सोमवारला रात्रीच्या फ्लाईटने मुंबईला पोहचणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे परतवाड्यातील ककराणी परीवारातील पाच सदस्य सुद्धा इथोपियातून सकुशल परतणार आहे.
युक्रेनप्रमाणेच इराणमध्ये राहणारे भारतीय आता त्यांच्या मायदेशी परतण्याची तयारी करत आहेत. युद्धाच्या परिस्थितीमुळे, अनेक भारतीय नागरिक आणि पर्यटकांनी देशाच्या दूतावास आणि आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधून इराण आणि विशेषतः दुबईमधून बाहेर पडण्याची विनंती केली आहे. या युद्धाच्या परिस्थितीत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष आपत्कालीन कक्षाला माहिती मिळाली आहे की अमरावतीतील एकूण १२ नागरिक दुबई आणि २ अबुधाबीमध्ये अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाला स्वतंत्र यंत्रणेद्वारे जिल्ह्यातील एकूण १४ नागरिकांची माहिती मिळाली आहे. या अहवालानुसार, दुबईच्या देइरा संकुलातील नाईट कॅसल हॉटेलमध्ये सध्या १२ नागरिक सुरक्षित आहेत. यामध्ये राजकुमार बल्लभ राठी, कविता आर. राठी, हेमंत घनश्याम राठी, कांता एच. राठी, गणेश एच. राठी, श्रेया गणेश राठी, सुनील बाजीराव चपाते, रजनी सुनील चपाते, प्रसाद सुनील चपाते, डॉ. आशिष नवलकिशोर मालानी आणि सपना आशिष मालानी, नसीम साल्हे यांचा समावेश आहेयामधील बहुतांश अमरावतीच्या नमुना परीसरातील आहे. ते शिक्षण आणि नोकरीसाठी त्यांच्या कुटुंबासह दुबईला गेले होते. याव्यतिरिक्त, २८ वर्षीय श्रावणी सुरेश मालकर आणि अमित वसेवाल हे दोघे अबू धाबी विमानतळावर अडकले असून परतीच्या प्रतीक्षेत आहे.
सर्व नागरिक सुरक्षित-जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असलेले एकूण १४ नागरिक सध्या सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दररोज त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. सध्या, सर्व १४ नागरिकांची माहिती मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाला सादर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आधारे पुढील कारवाई करेल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी