
रायगड, 04 मार्च (हिं.स.)। जिल्हा रुग्णालय अलिबाग ने पुन्हा एकदा राज्यभरात आपली छाप उमटवली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राज्यात थेट द्वितीय क्रमांक पटकावत रुग्णालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डिजिटल आरोग्यसेवेच्या क्षेत्रात ही कामगिरी अत्यंत मानाची मानली जात आहे.
‘ई-सुश्रुत’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे रुग्णालयातील सेवा पूर्णपणे बदलून गेली आहे. जानेवारी २०२६ महिन्यात तब्बल ६ हजारांहून अधिक टोकन जनरेट करण्यात आले, तर ३ हजारांपेक्षा जास्त हेल्थ रेकॉर्ड लिंकेज ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात आले. रुग्णालयातील सर्व १६ विभागांचे कामकाज आता पूर्णपणे डिजिटल झाले असून रुग्ण नोंदणीपासून उपचारांपर्यंत सर्व प्रक्रिया वेगवान व पारदर्शक झाली आहे.
या दैदिप्यमान यशाची दखल घेत प्रकाश आबिटकर आणि मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य पुरस्कार २०२६” प्रदान करून रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला.
रायगड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली असून डिजिटल आरोग्य व्यवस्थेत अलिबागने राज्यात आपला ठसा उमटवला आहे. आरोग्य सेवेतला हा ‘डिजिटल क्रांती’चा धडाका सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके