लातूरमध्ये लाईनमन दिवस उत्साहात
लातूर, 04 मार्च (हिं.स.)। ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता प्रसंगी जीवाची बाजी लावणारे लाईनमन आणि लाईनवुमन हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे खरे चेहरे आहेत, असे प्रतिपादन मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी के
लाईनमन डे


लातूर, 04 मार्च (हिं.स.)। ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता प्रसंगी जीवाची बाजी लावणारे लाईनमन आणि लाईनवुमन हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे खरे चेहरे आहेत, असे प्रतिपादन मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले. वैयक्तिक सुरक्षेला प्राधान्य देत ग्राहकहित जपत कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. चौथ्या राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त सर्व लाईनमन व लाईनवुमन यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एमआयडीसी परिसरातील उद्योग मित्र भवन येथे आज (दि. ४ मार्च) लाईनमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध घाटगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ, उपकार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे, शैलेश पाटील, श्रीशैल लोहारे, काळे तसेच लाईनमन दासराव बीडगर आणि छाया गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर विभागातील सर्व लाईनमन यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

मुख्य अभियंता बुलबुले म्हणाले की, वीजपुरवठा सुरळीत करताना अनेक लाईनमन शॉर्टिंग रॉडसारख्या सुरक्षा साधनांचा वापर टाळतात आणि फाजील आत्मविश्वासामुळे अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सर्व सुरक्षा साधनांचा काटेकोर वापर करणे अत्यावश्यक आहे. अपघातविरहित सेवा देतानाच कार्यक्षमता अबाधित ठेवून परिमंडळाची वसुली क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. मार्च अखेरपर्यंत ‘शंभर टक्के थकबाकी शून्य’ मोहीम प्रभावीपणे राबवावी, तसेच ग्राहकाभिमुख सेवा देत दिलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत आणि स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande