
पुणे, 04 मार्च (हिं.स.)। पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रीक प्रणालीवर हजेरी लावणे आवश्यक आहे. पण फक्त तीन हजार ते साडेतीन हजार कर्मचारीच रोज बायोमॅट्रीक हजेरी लावत आहेत. त्यामुळे एकीकडे ऑनलाइन सेवेत सर्वोत्तम अशी कौतुकाची थाप घ्यायची आणि दुसरीकडे ऑनलाइन हजेरीबाबत उदासीनता दाखवायची असे दुटप्पी धोरण दिसून येत आहे. त्यामुळे १ मार्चपासून बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेत सुमारे १७ हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे साडेसात हजार कर्मचारी हे झाडणकाम करणारे आणि बिगारी आहेत. या कर्मचाऱ्यांची हजेरी ही घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे घेतली जाते. तर उर्वरित वर्ग एक ते वर्ग चार मधील अधिकाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीकद्वारे घेतली जाते.महापालिकेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. पण अनेक कर्मचारी पावणे दहा वाजून गेले तरी महापालिका भवन, क्षेत्रीय कार्यालय यासह अन्य ठिकाणी असलेल्या कार्यालयात पोचत नाहीत. शुक्रवारी दुपारनंतर तर महापालिकेत शुकशुकाट असतो. अनेकजण घरी लवकर निघून जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु