
रायगड, 04 मार्च (हिं.स.)। श्रीवर्धन तालुक्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मद्यधुंद वाहनचालकांवर कडक कारवाई तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक दिशा मार्ग (वन-वे) सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली. पतंगे रिसॉर्ट येथे आयोजित बैठकीत त्यांनी नागरिक, व्यापारी, पर्यटन व्यवसायिक व शांतता समिती सदस्यांशी संवाद साधला.
गेल्या काही वर्षांत श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही गंभीर अपघातांमध्ये पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला असून अनेक चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून जसवली फाटा आणि वडवली फाटा येथे चेक पोस्ट उभारून ब्रेथलायझर चाचण्या केल्या जाणार आहेत. दोषी चालकांवर तत्काळ कारवाई तसेच वाहनातील मद्यसाठ्यावरही कारवाई केली जाईल, असे अधीक्षकांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टिळक रस्ता या मार्गावर एक दिशा मार्ग लागू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून भाजी व मच्छी विक्रेत्यांनी अधिकृत गाळ्यांमध्येच व्यवसाय करावा, असे आवाहन करण्यात आले. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
दरम्यान, दिवेआगर येथील ग्रामस्थांनीही सुट्टीच्या दिवशी वन-वे सुरू करण्याची तसेच नियमभंग करणाऱ्या बार व शॉप्सवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासन जनतेच्या सहकार्याने ठोस उपाययोजना करेल, असा विश्वास अधीक्षक दलाल यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके