डिजिटल सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्कराचे भावी अधिकारी सज्ज
* SRMIST च्या ३५० छात्र सैनिकांनी स्वीकारली पदविका मुंबई, 04 मार्च (हिं.स.) - देशाच्या सीमांसोबतच आता डिजिटल सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय लष्कराचे भावी अधिकारी सज्ज झाले आहेत. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधील ३५० छात्र सैनिकांच्या पहिल
SRMIST


* SRMIST च्या ३५० छात्र सैनिकांनी स्वीकारली पदविका

मुंबई, 04 मार्च (हिं.स.) - देशाच्या सीमांसोबतच आता डिजिटल सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय लष्कराचे भावी अधिकारी सज्ज झाले आहेत. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधील ३५० छात्र सैनिकांच्या पहिल्या तुकडीने 'आयटी आणि सायबर सुरक्षा' या विषयातील आपली पदविका यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (एसआरएमआयएसटी) आणि ओटीए यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत हा विशेष पदविका कार्यक्रम राबवण्यात आला होता. मंगळवारी पार पडलेल्या या दीक्षांत समारंभात ३२१ पुरुष आणि २९ महिला कॅडेट्सना ही पदविका प्रदान करण्यात आली. या तुकडीने शैक्षणिक क्षेत्रातही आपली मोहोर उमटवली असून, यामध्ये १६ रँक होल्डर्सचा समावेश आहे.

या विशेष अभ्यासक्रमाची रचना लष्करी प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्य यांचा मेळ घालून करण्यात आली होती. यात प्रामुख्याने नेटवर्क सुरक्षा, डेटा संरक्षण, सायबर युद्धनीती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक विषयांवर भर देण्यात आला आहे.

याप्रसंगी बोलताना एसआरएमआयएसटीचे कुलगुरू प्रा. सी. मुथमिझचेलवन यांनी या पदविकेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, युद्धाचे स्वरूप आता केवळ प्रत्यक्ष सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज भारताची सुरक्षा मैदानाप्रमाणेच कॉम्प्युटर स्क्रीनवरूनही हाताळली जात आहे. ही पदविका केवळ एक शैक्षणिक टप्पा नसून आपल्या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचे धोरणात्मक बळकटीकरण आहे. लष्करी प्रशिक्षणाचे कठोर वेळापत्रक सांभाळून हा तांत्रिक अभ्यासक्रम लवचिक पद्धतीने राबवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

ओटीए चे कमांडंट लेफ्टनंट जनरल मायकेल ए.जे. फर्नांडिस यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. आधुनिक युद्धभूमीवर तांत्रिक शिक्षणाची जोड असणे हे लष्करी अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक क्षमतेत मोलाची भर घालणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

या समारंभाला एसआरएमआयएसटीचे कुलसचिव डॉ. एस. पोन्नुसामी, प्रो-कुलगुरू प्रा. ए. विनय कुमार आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande