मार्वेल ग्रुपचे मालक विश्वजीत झावर यांना मोठा झटका
* २२७ कोटींच्या थकबाकीमुळे दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू मुंबई, 04 मार्च (हिं.स.) : पुण्यातील प्रसिद्ध ''मार्बल ग्रुप''चे मालक आणि प्रवर्तक विश्वजीत झावर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT), मुंबई खंडपीठाने झावर यांच्
विश्वजीत झावर


* २२७ कोटींच्या थकबाकीमुळे दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू

मुंबई, 04 मार्च (हिं.स.) : पुण्यातील प्रसिद्ध 'मार्बल ग्रुप'चे मालक आणि प्रवर्तक विश्वजीत झावर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT), मुंबई खंडपीठाने झावर यांच्या विरोधात वैयक्तिक हमीदार (Personal Guarantor) म्हणून दिवाळखोरीची प्रक्रिया (Insolvency Proceedings) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

२०१७ मध्ये 'एपीआरएन एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड' (पूर्वीची अन्सॅपक प्रा. लि.) या कंपनीने मार्वेल ग्रुपच्या 'मार्वेलेज रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला आंतर-कॉर्पोरेट ठेव (ICD) स्वरूपात कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी विश्वजीत झावर यांनी स्वतःची वैयक्तिक हमी (Personal Guarantee) दिली होती. मात्र, संबंधित कंपनी मे २०१७ पासून कर्जाचे हप्ते फेडण्यास अपयशी ठरली. जानेवारी २०२५ मध्ये दोन्ही पक्षांत तडजोड झाली होती, तरीही थकबाकी न मिळाल्याने अखेर मे २०२५ मध्ये झावर यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. ३१ मे २०२५ पर्यंत ही थकबाकी तब्बल २२६.८९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

न्यायालयाचे निरीक्षण आणि निर्बंध

एनसीएलटीने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, कर्ज, डिफॉल्ट आणि वैयक्तिक हमीचे पुरावे रेकॉर्डवर स्पष्ट आहेत. झावर यांनी न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी दिलेल्या संधीचा लाभ घेतला नाही. या आदेशानुसार, आता झावर यांच्यावर 'मोरेटोरियम' (Legal Freeze) लागू झाला असून, त्यांना त्यांची कोणतीही वैयक्तिक मालमत्ता विकता येणार नाही, गहाण ठेवता येणार नाही किंवा हस्तांतरित करता येणार नाही.

या प्रकरणासाठी 'ट्रुविझरी इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स प्रायव्हेट लिमिटेड' यांची 'रिझोल्यूशन प्रोफेशनल' (RP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या बँका, वित्तीय संस्था किंवा इतर वैयक्तिक कर्जदारांचे झावर यांच्याकडे येणे आहे, त्यांनी पुढील २१ दिवसांच्या आत आपले दावे अधिकृत पुराव्यांसह सादर करावेत तसेच ईमेल contactanshulgupta@gmail.com किंवा फोन : 9619114523 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीत दावे सादर न केल्यास संबंधित कर्जदारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही असेही संबंधित अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande