
लातूर, 04 मार्च (हिं.स.)वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी लातूर महानगरपालिकेने अनेक कर सवलतीची योजना राबवली मात्र बर्याच मालमत्ताधारकांनी याकडे कानाडोळाच केला.त्यामुळे महानगरपालिकेमार्फत जप्ती मोहिम राबविण्यात येत आहे.त्याकरिता चार मुख्य कार्यालयातील पथक व चार क्षेत्रीय कार्यालय पथक असे एकूण आठ पथके नेमण्यात आले आहेत.
महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रलंबित मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मालमत्ताकराची थकबाकी ठेवणाऱ्या करदात्यांविरुद्ध कठोर पावले उचलून त्यांच्या मालमत्तांवर जप्ती व नळ खंडन कारवाई करण्यात येत आहे.
क्षेत्रीय कार्यालय सी अंतर्गत रु. ८,४५,०००/-थकित मालमत्ता करापोटी २ दुकाने सील करण्यात आली तसेच गंजगोलाई परिसरात रु.२,३३,१२०/- थकबाकी पोटी दोन दुकाने जप्त करण्यात आले. क्षेत्रीय कार्यालय अ अंतर्गत २,००,९६२/- थकित मालमत्ता करापोटी २ दुकाने सील करण्यात आली तसेच चार निवासी मालमत्तांवर अटकावणी व नळखंडनाची कार्यवाही करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय ड अंतर्गत एकूण सहा मालमत्तांचे अटकावणी व नळखंडन करण्यात आले. क्षेत्रीय कार्यालय ब अंतर्गत २ मालमत्तांची अटकावणी व २ मालमत्तांचे नळ खंडन करण्यात आले.
या व्यतिरिक्त शहरातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून मालमत्ता व पाणी कर भरण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी महानगरपालिकेने १२ स्वतंत्र पथके नेमलेले आहेत. या १२ पथकातील जवळपास १०० कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्ता कराचा व पाणी कराचा भरणा करून घेत आहेत.
थकीत कराच्या वसुलीसाठी मनपाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे जप्तीसारखी कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरून मनपाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त श्रीमती मानसी व उपायुक्त (कर संकलन) डॉ.पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis