राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नवनीत राणा भावूक
अमरावती, 04 मार्च (हिं.स.) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील चार नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने यावेळीही धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनेक दिग्गज नेते प्रतीक्षायादीत असताना भाजपने ‘सामाजिक अभियांत्रिकी’चा प्रयोग केल्याचे चित
‘संघर्ष करना मेरे लिए नई बात नही है, मै किसी भी मोड से नई शुरूवात कर सकती हूं’ राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नवनीत राणा भावूक


अमरावती, 04 मार्च (हिं.स.)

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील चार नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने यावेळीही धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनेक दिग्गज नेते प्रतीक्षायादीत असताना भाजपने ‘सामाजिक अभियांत्रिकी’चा प्रयोग केल्याचे चित्र दिसून आले. भाजपच्या नेत्या, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण, त्यांना यावेळी संधी नाकारण्यात आली.

नवनीत राणा यांनी समाज माध्यमावर चार ओळींचा संदेश देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘संघर्ष करना मेरे लिए नई बात नही है, मै किसी भी मोड से नई शुरूवात कर सकती हूं’.

नवनीत राणा यांना राज्यसभेत पोहचण्याची संधी नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने भावनिक झालेल्या नवनीत राणांनी संघर्ष ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही, मी कुठल्याही वळणावरून नवीन सुरूवात करू शकते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नवनीत राणा यांनी आक्रमकपणे हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपचा प्रचार विधानसभा निवडणुकीच्या काळात केला. लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत होऊनही आपण राजकीयदृष्ट्या सक्रिय आहोत, हा संदेश त्यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यशही मिळाले. नवनीत राणा २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या. अमरावती मतदारसंघातून त्या अपक्ष निवडून आल्या. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचा विरोध असतानाही त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना उमेदवारी दिली गेली. पण काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी त्यांचा पराभव केला.

राणा यांची भूमिका भाजपला पूरक राहिलेली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालिसा पठणाचा मुद्दा गाजवला होता. त्या सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करतात. लोकसभेतील पराभवानंतर त्या संसदेत जाण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात होते. पण, अमरावतीतून डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेवर याआधीच संधी मिळाली आहे. नवनीत राणा यांनी महापालिका निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत वादातून आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला मदत करण्याच्या उद्देशाने भाजपच्या १३ उमेदवारांच्या पराभवासाठी हातभार लावल्याचा आरोप करण्यात आला. त्यातच भाजपचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि नवनीत राणा यांच्यातील वाद कायम आहे. त्यामुळे भाजपने नवनीत राणा यांची संधी डावलली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande