
परभणी-हिंगोली जिल्ह्यात जल्लोष : धनगर समाजास न्याय
परभणी, 04 मार्च (हिं.स.)।
माजी विधानपरिषद सदस्य रामराव वडकुते यांना भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्टींनी बुधवारी (दि.04) राज्यसभेकरीता उमेदवारी जाहीर करीत त्यांचे राजकीय पुनर्वसन तर केलेच परंतु, वडकुते यांच्यासह ओबीसी समाजास विशेषतः धनगर समाजास मोठा सुखद धक्का दिला.
कॉगे्रसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वडकुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी ते ज्येष्ठ नेते शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ते राष्ट्रवादीच्या वर्तूळात वावरत होते. त्यावेळी धनगर समाजाचे नेते म्हणून वडकुते यांना राष्ट्रवादीने अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात महामंडळाच्या माध्यमातून समाजात व राजकीय क्षेत्रात कमालीचे सक्रिय राहिले. 2004 च्या विधानसभा निवडणूकीत वडकुते यांना राष्ट्रवादीने कळमनुरी या मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली. त्या निवडणूकीत वडकुते यांनी लक्षणीय मते मिळवली. परंतु ते पराभूत झाले. त्यानंतरसुध्दा राष्ट्रवादीने त्यांचे विधानपरिषदेवर संधी देऊन राजकीय पुनर्वसन केले. मात्र 2019 साली वडकुते यांनी राष्ट्रवादीस सोडचिठ्ठी दिली अन् भाजपात प्रवेश केला. परंतु, कळमनुरी मतदारसंघात भाजपाचे वडकुते यांना उमेदवारी दिलीच नाही. त्यांचे पुनर्वसनही केले नाही. परंतु, पक्षीय पातळीवर हिंगोली लोकसभेचे प्रभारी म्हणून त्यापुढे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने वडकुते यांना संघटनात्मक कामात गुंतवले. पक्षीय पातळीवरसुध्दा वडकुते यांनी सातत्याने दौरे, विविध उपक्रम राबवून श्रेष्ठींचे लक्ष वेधून घेतले. परंतु, त्यांचे राजकीय पुनर्वसन झालेच नाही. त्यामुळे ते अलिकडे राजकीयदृष्ट्या बॅकफूटवर गेले की काय अशी शंका उद्भवली तेव्हाच पक्षश्रेष्ठींनी राज्यसभेच्या सदस्यत्वाच्या रिक्त जागेकरीता वडकुते यांच्या उमेदवारीबाबत गांभीर्याने विचार विनिमय करीत शिक्कामोर्तब केले. अन् त्याद्वारे, वडकुते यांचे राजकीय पुनर्वसन, ओबीसी समाजास विशेषतः धनगर समाजास सुखद धक्का देऊन न्याय दिला आहे.
वडकुते यांच्या या उमेदवारीने परभणी व हिंगोली या जिल्ह्यास त्यांच्या रुपाने खासदार उपलब्ध झाला आहे.
पक्षाचे आभार तरी कसे मानू...
देशाच्या सर्वोच्च सभागृहात सदस्य म्हणून पाठविण्याचा भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींचा निर्णय माझ्याकरीता मोठा सुखद धक्का आहे. अशी संधी मिळेल या गोष्टीचा मी कधीही विचारसुध्दा केला नव्हता. मला न मागता, न कळवता पक्षश्रेष्ठींनी माझी निवड केली, हे माझे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे भाग्य आहे. जेव्हा श्रेष्ठींद्वारे त्या संबंधीची माहिती मला कळविण्यात आली त्यावेळी मला रडू कोसळलं. श्रेष्ठींचे, पक्षाचे आभार तरी कसे मानू, त्यासाठी शब्दच नाहीत. या संधीचा, या पदाचा आपण निश्चित उपयोग करु, समाजासाठी अहोरात्र काम करु, त्यात आपण मूळीच कमी पडणार नाही. पक्षाने, श्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे राज्य सभेचे उमेदवार रामराव वडकुते यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis