छ.संभाजीनगर येथील प्राचीन बौद्ध लेणी परिसरात अवैध उत्खनन, ऐतिहासिक स्थळ धोक्यात!
मुंबई, 04 मार्च (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थ
छ.संभाजीनगर येथील प्राचीन बौद्ध लेणी परिसरात अवैध उत्खनन, ऐतिहासिक स्थळ धोक्यात!


मुंबई, 04 मार्च (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. बुद्ध लेणी बचाव कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत, या तस्करीला जबाबदार असलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर आणि भू-माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथील पहाडसिंगपुरा परिसरातील प्राचीन बौद्ध लेणी आणि हरसूल तलावापर्यंतच्या गायरान जमिनीवर अहोरात्र मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने मुरुम, माती यांचे अवैध उत्खनन सुरू आहे. यामुळे पुरातत्त्वदृष्ट्या संवेदनशील असलेल्या टेकड्यांना आणि लेणींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. मागील एक वर्षापासून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी श्री. वेंकटेश राठोड, अपर तहसीलदार श्री. उमेश पाटील आणि नायब तहसीलदार श्री. परेश चौधरी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही गौण खनिज उत्खनन थांबलेले नाही, अशी माहिती औचित्याच्या माध्यमातून वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.

महसूल प्रशासनाकडून केवळ नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात, परंतु प्रत्यक्षात कोणतीही दंडात्मक वसुली किंवा ठोस कारवाई केली जात नाही. रॉयल्टी चोरी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

केवळ लेणी परिसरच नव्हे, तर गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध रेती उत्खननाबाबतही जिल्हा प्रशासनाविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरू आहे.अवैध उत्खनन करणाऱ्या भू-माफियांवर तात्काळ गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, तक्रारींची दखल न घेणाऱ्या आणि माफियांना छुप्या पद्धतीने मदत करणाऱ्या संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती वाहनांवर कारवाई केली आणि किती दंड प्रत्यक्ष वसूल केला, याचा अहवाल सादर करावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande