
मुंबई, 04 मार्च (हिं.स.) - सांगलीतील मॉर्डन स्कूल हा कार्यक्रम राज्यभर वापरून शाळांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी एका लक्षवेधी सुचनेवरील चर्चेदरम्यान केली.
जयंतराव पाटील म्हणाले की, २०१९ ते २०२१ या कालावधीत मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मॉर्डन स्कूल हा कार्यक्रम राबविला. त्यात ५२५ शाळांचा भौतिक आणि गुणात्मक विकास साधला. प्रत्येक शाळेत मैदान, कंपाऊंड, सुसज्ज शौचालय, हॅण्ड वॉशिंग स्टेशन्स निर्माण केले आहेत. डीपिडीसीचा निधी आणि लोकवर्गणीतून आम्ही हे साकारले आहे. सर्व पालकमंत्र्यांनी किमान २०% डीपिडीसीचा निधी शाळांसाठी राखीव ठेवण्याचा आग्रह धरावा म्हणजे शाळांचा दर्जा सुधारेल. तसेच पुढे सांगताना ते म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांनी हा उपक्रम राज्यभर राबविण्याचे ठरवले होते. माझी विनंती आहे की शिक्षण मंत्र्यांनी आणि सदस्यांनी आवर्जून आमच्या शाळांना भेट द्यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी