
पुणे, 04 मार्च (हिं.स.)। श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे आणि जुन्नर शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शुक्रवारी (६ मार्च) शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी सात वाजता शिवाई मातेस अभिषेक, छबिना मिरवणूक, शिवजन्मोत्सव, छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४७ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी दिली.
किल्ले शिवनेरीवर शुक्रवारी सकाळी सात वाजता शिवजन्मस्थळावर शिवशंकर स्वामी यांच्या हस्ते शिवाई मातेस अभिषेक व महापूजा होईल. उत्सवात पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी नऊ वाजता शिवजन्मोत्सव साजरा करतील. यावेळी भोसरी येथील इंद्रायणीनगरच्या रणरागिणी नारीशक्ती संस्थेच्या कलाकारांचर्फे छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यानंतर ध्वजारोहण होऊन शिवकुंजावर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने शिवजागर हा पोवाडे सादरीकरणाचा कार्यक्रम आणि त्यानंतर धर्मविचार मंथन व धर्मसभा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु