
जळगाव, 04 मार्च (हिं.स.) : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका हॉटेलला अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ हॉटेलमधील पाच ते सहा गॅस सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य स्फोटाचा धोका टळून मोठा अनर्थ टाळला गेला. कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तसेच नशिराबाद येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
दरम्यान, या आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमके नुकसान किती झाले याचा पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर