
रायगड, 04 मार्च (हिं.स.)। माथेरान पोलीस ठाणे हद्दीत रंगोली हॉटेल परिसरात संशयातून झालेल्या वादातून एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच ठिकाणी काम करत असून परस्परांचे मित्र आहेत. दोघेही फिरण्यासाठी माथेरान येथे आले होते. रंगोली हॉटेल येथे रूममध्ये असताना आरोपीला एका मुलीचा वारंवार फोन येत असल्याने फिर्यादीने त्याबाबत विचारणा केली. यावरून दोघांमध्ये संशय निर्माण होऊन वाद झाला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आपल्या जवळील धारदार वस्तूने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलीसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीस अटक केली. या प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ०२/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके