
रायगड, 04 मार्च (हिं.स.)। कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कडाव येथील बौद्धवाडा परिसरात गंभीर प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी कथित वाईट वक्तव्य केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावाने एका कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण व धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी व आरोपी हे एकमेकांना ओळखतात. फिर्यादीचे पती घरी असताना आरोपी क्र. १ ते १४ व इतर काही जणांनी डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत कथित अपमानास्पद टिप्पणी केली. या घटनेनंतर आरोपींनी रागाच्या भरात फिर्यादींच्या घरासमोर जमाव जमवून गैरकायदेशीररीत्या घरात प्रवेश केला.
“शिवीगाळ केली, आता दाखवतोच,” असे म्हणत आरोपींनी फिर्यादी, तिचे पती व साक्षीदारांना हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ११३/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ३३३, ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके