
नाशिक, 04 मार्च (हिं.स.)। दुकानात काम करणाऱ्या कारागिराने मालकाच्या जेवणात गुंगीकारक औषध टाकून दुकानातील ५० तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह ५० हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना सराफ बाजारात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी २ बिप्लाप रबिंद्रनाथ पोरेल (वय ४२) यांचा भाऊ सोमनाथ याचे सराफ बाजारात सोमनाथ पॉलिसवाला नावाचे दुकान आहे. या दुकानात आरोपी सौमित्र उर्फ राज मोंडेल (रा. भन्जीपूर, ताडकेश्वर, जि. हुबळी, राज्य प. बंगाल) हा कारागीर म्हणून कामाला होता. दि. १ मार्च रोजी रात्री सोमनाथ हे जेवायला बसण्याच्या आधी आरोपी सौमित्रने सोमनाथच्या जेवणात काही तरी गुंगीकारक औषध टाकले होते.
सोमनाथला याची कल्पना नसल्याने जेवल्यानंतर या गुंगीकारक औषधामुळे तो बेशुद्ध पडला. त्यावेळी सौमित्रने दुकानातील ५० तोळे वजनाचे सोन्याचे मणी, कानातले, अंगठी व इतर दागिने तसेच ५० हजार रुपये रोख असा एकूण ५० लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सौमित्र विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहे. सौमित्र हा १५-२० दिवसांपूर्वीच सोमनाथ यांच्याकडे कामाला लागला होता. गावाकडचा असल्याने त्यांनी सौमित्रला कामाला ठेवून घेतले होते. या घटनेने सराफी व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV