रायगड - पतीच निघाला पत्नीचा मारेकरी, काही तासातच अटक
रायगड, 04 मार्च (हिं.स.)। तालुक्यातील दगडघुम परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, पतीनेच आपल्या २० वर्षीय पत्नीचा डोक्यात जोरदार प्रहार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी अवघ्या काही तासांत कारवाई करत म्हसळा पोलीस ठाणे
धक्कादायक! पतीनेच पत्नीची हत्या; काही तासांत आरोपी जेरबंद


रायगड, 04 मार्च (हिं.स.)। तालुक्यातील दगडघुम परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, पतीनेच आपल्या २० वर्षीय पत्नीचा डोक्यात जोरदार प्रहार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी अवघ्या काही तासांत कारवाई करत म्हसळा पोलीस ठाणे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दगडघुम येथील जांभा दगड चिरेखाणीवर मजूर म्हणून काम करणारा सतीश उर्फ तुकाराम उर्फ बबलू सुभाष चव्हाण (वय २३) आणि त्याची पत्नी निकिता सतीश चव्हाण (वय २०) हे दोघे सहा महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झाले होते. निकिता ही सतीशच्या सख्या मामाची मुलगी होती. उदरनिर्वाहासाठी दोघेही चिरेखाणीत काम करत होते.मात्र लग्नानंतर सतीश हा निकितावर सतत शिवीगाळ, मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी तो निकितावर तगादा लावत असल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. घटनेच्या दिवशी झालेल्या वादादरम्यान निकिताने विरोध केल्याने सतीशने तिच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात निकिताचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह जंगलातील शेताच्या बांधाजवळ टाकून देण्यात आला.दि. २ मार्च रोजी निकिता बेपत्ता झाल्याची माहिती सतीशनेच तिच्या वडिलांना – महादेव रामू राठोड (वय ५०, रा. माशाळा, ता. अफजपूर, जि. गुलबर्गा) – दिली. यानंतर मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना सतीशच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कसून चौकशी करण्यात आली. अखेर त्यानेच पत्नीचा खून करून बनाव रचल्याचे उघड झाले.

या प्रकरणी गुन्हा रजि. क्र. ३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, ८५, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, अंमलदार बी. जी. बोंगाणे व पथकाने केली.

दरम्यान, “माझ्या मुलीचा खून तिच्या नवऱ्यानेच केला असून त्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. या प्रकरणात इतर साथीदार असण्याची शक्यता असून त्याचाही सखोल तपास व्हावा,” अशी मागणी निकिताचे वडील महादेव रामू राठोड यांनी केली आहे. या घटनेमुळे दगडघुम परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande