
विश्वस्तांच्या भूमिकेबद्दलही जोरदार टीका
त्र्यंबकेश्वर , 04 मार्च (हिं.स.)।
: येथे दि. १ मार्च रोजी परप्रांतीय भाविकाला झालेल्या मारहाणीचे पडसाद समाजमाध्यमांत उमटले आहेत. भाविकाला झालेली मारहाण पाहून अनेकांनी दर्शन न घेताच माघारी परतणे पसंत केले. येथील पूजाविधी आणि दर्शनासाठी केलेले बुकिंग रद्द करणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम येथील भाविकांच्या संख्येवर होत असल्याचे घटनेच्या तिसऱ्या दिवशी स्पष्ट झाले आहे.
शासकीय सुटी असतानादेखील येथे भाविकांचा ओघ कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत भाविकांमध्ये चर्चा होत आहे. मंदिराच्या दोनशे रुपये दर्शनबारीला शुकशुकाट होता, तर पूर्व दरवाजा दर्शनबारीदेखील रिकामी होती. समाजमाध्यमावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
यात त्र्यंबकेश्वर येथे भाविक पर्यटनावर आधारित व्यावसायिकदेखील आरेरावी करत असल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाविकाला झालेल्या मारहाणीचे समर्थन काही विश्वस्तांनी केले. याबाबतदेखील नाराजीचा सूर दिसत आहे. यात भाविकाची चूक असेल मात्र, त्याला माराहाण करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल उपस्थित होत आहे.
त्र्यंबक नगरपरिषदेने हे वाहनतळ मोफत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दर महिन्याला वीजबिल भरण्यासाठी सहाय्य म्हणून ८ ते १० लाख रुपये दिले जातात. भाविकांच्या दानातून मिळालेला पैसा नगरपरिषद घेत असेल तर भाविकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे मत येथे आलेल्या भाविकांनी व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV