
सोलापूर, 04 मार्च (हिं.स.)।
सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार मिळतो. समाजातील एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करणारे असे उपक्रम सातत्याने राबवले पाहिजेत, असे प्रतिपादन अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले.युवक नेतृत्व कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग रमेश भोसले यांनी सलग चौथ्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. यंदा 10 वधू-वरांच्या जोड्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नवदांपत्यांना बेड, भांडी, रॅक, मुलींसाठी सोन्याचे मंगळसूत्र तसेच वधू-वरांना सर्व कपडे व बूट आदी साहित्य मोफत देण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल बजरंग भोसले व त्यांचे वडील रमेश भोसले यांचे विशेष कौतुक शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते-पाटील, ईश्वरीदेवी कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील, संचालक रामचंद्र सावंत-पाटील, प्रकाश आप्पा पाटील, डॉ. एम. के. इनामदार, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड