
पुणे, 04 मार्च (हिं.स.)।
आगामी उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून खडकी-इंदूर आणि हडपसर-प्रयागराज या दोन गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये इंदूर-खडकी-इंदूर साप्ताहिक विशेष आणि हडपसर-प्रयागराज साप्ताहिक विशेष गाड्या होळीसाठी सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे या गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, इंदूर, प्रयागराजसह उत्तर व मध्य प्रदेशात जाणाऱ्यांना तिकीट आरक्षण उपलब्ध झाले आहे.ट्रेन क्रमांक ०९३२४ इंदूर खडकी विशेष गाडी आठवड्याच्या प्रत्येक सकाळी सव्वाअकरा वाजता इंदूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी वाजता खडकी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९३२३ खडकी - इंदूर स्पेशल ट्रेन दि. ५ ते २६ मार्च दरम्यान दर गुरुवारी खडकीहून पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी इंदूरला पोहोचेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु