
परभणी, 05 मार्च (हिं.स.) परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत 691 कामांना मंजुरी मिळाली खरी, परंतु त्यापैकी 430 कामे पूर्ण होऊ शकली. 261 कामे अद्यापही अपूर्ण आहेत, रखडली आहेत. ‘जलजीवन’च्या या कामांवर 358 कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित कामे पूर्ण व्हावीत या करीता 264 कोटी रुपयांची गरज भासणार आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत या जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेल्या कामां संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्याद्वारे, सरकारने या बाबत जाब द्यावा, असे म्हटले. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी लेखी उत्तर देतेवेळी या योजनेंतर्गत 49 कामे प्रगतीपथावर आहेत, असे नमूद करीत रखडलेल्या उर्वरित कामांबाबत पाणी पुरवठा विभागाने संबंधित कंत्राटदारांना लेखी जबाब मागितले आहेत. तसेच 147 कंत्राटदारांना 1 कोटी 67 लाख रुपयांचा वेळेत काम पूर्ण न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कमही पूर्णतः वसूल करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
उर्वरित योजना पूर्ण करण्यासाठी 264 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची गरज आहे, केंद्र सरकारच्या हिश्याची रक्कम मिळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अतिरिक्त नियतव्यय वाढवून देण्याची प्रक्रिया सुरू केली असून राज्य सरकारच्या हिश्याची रक्कम येत्या अर्थसंकल्पात मंजूर होताच उर्वरित निधी वर्ग करण्यात येईल, अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis