मुंबई महापालिकेत ९ हजार पदांसाठी मेगा भरतीची चर्चा
रायगड, 05 मार्च (हिं.स.) : मुंबई महानगरपालिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतानाही केवळ ९,२९५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्यामुळे “मेगा भरती” ही केवळ नामांतर झालेली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार
56-thousand-posts-vacant-recr


रायगड, 05 मार्च (हिं.स.) : मुंबई महानगरपालिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतानाही केवळ ९,२९५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्यामुळे “मेगा भरती” ही केवळ नामांतर झालेली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ५६,१२६ पदे रिक्त असून एकूण मंजूर पदांची संख्या १,४५,२५६ आहे. त्यापैकी ८९,१३० पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ७० हजार पदांची नवीन भरती पद्धतीने होईल, अशी घोषणा केली होती. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत सेवा प्रवेश नियमावली सुधारणा आणि टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबविण्याबाबत चर्चा झाली होती.

या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना पत्र लिहून तातडीने पदभरती करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महसुली खर्च कमी करण्यासाठी पदसंख्या कमी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. प्रशासनाने संगणकीय युगात कामकाजाच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आस्थापना रचनेचा फेरआढावा घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

भरतीची गती आणि रिक्त पदांवरील निर्णय भविष्यात महापालिकेतील प्रशासन व कर्मचारी व्यवस्थापनावर मोठा परिणाम करतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande