मध्यपूर्वेत अडकलेल्या 20 परभणीकरांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न सुरू
परभणी, 05 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांतील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. परिणामी, परभणी जिल्ह्यातील काही नागरिक संबंधित देशांमध्ये अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. नागरिकांन
मध्यपूर्वेत अडकलेल्या 20 परभणीकरांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न सुरू


परभणी, 05 मार्च (हिं.स.)।

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांतील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. परिणामी, परभणी जिल्ह्यातील काही नागरिक संबंधित देशांमध्ये अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांच्या सूचनांचे पालन करावे, तसेच ज्या नागरिकांचे नातेवाईक मध्यपूर्वेतील संबंधित देशांमध्ये अडकले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक 02452-226 400 तसेच संपर्क अधिकारी पवन खांडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, संपर्क 9975013726, 7020825668, या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या नातेवाईकांविषयी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील एकूण 20 नागरिक सध्या दुबई, बेहरीन देशांमध्ये विमानसेवा बंद असल्यामुळे परत येऊ शकलेले नाहीत. ज्यामध्ये पाथरी तालुक्यातील एकूण 06, जिंतूर तालुक्यातील 09 तसेच मानवत तालुक्यातील 02 आणि परभणीमधील 03 नागरिकांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून, राज्य नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आलेल्या विहित नमुन्यात वर नमूद नागरिकांची माहिती शासनास सादर करण्यात आली आहे.

राज्य नियंत्रण कक्षामार्फत परराष्ट्र मंत्रालय व संबंधित भारतीय दूतावासांशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत असून वेळोवेळी प्राप्त होणा-या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. अशावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande