
परभणी, 05 मार्च (हिं.स.) :परभणी जिल्ह्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप होत असून बाजारात २६६ रुपयांची युरिया खताची बॅग साडेतीनशे रुपयांना विकली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पूर्णा शहरासह तालुक्यातील विविध भागातून मोंढा बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रे व व्यापाऱ्यांकडून युरिया खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र साडेतीनशे रुपये दिल्यानंतरच शेतकऱ्यांना युरिया खत दिले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तसेच युरिया खत देताना इतर खत खरेदी करण्याची सक्ती देखील काही व्यापाऱ्यांकडून केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
शासनाने खत वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली असतानाही बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. या प्रकाराकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis