त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या कामकाजाची चौकशी होणार
विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश नाशिक, 05 मार्च, (हिं.स.)। त्र्यंबकेश्वरमध्ये लूट होत असल्याचे भाविकांचे आरोप, त्यातून सातत्याने उद्भवणारे वाद आणि भाविकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्
An inquiry will be conducted


विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

नाशिक, 05 मार्च, (हिं.स.)। त्र्यंबकेश्वरमध्ये लूट होत असल्याचे भाविकांचे आरोप, त्यातून सातत्याने उद्भवणारे वाद आणि भाविकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानातील वादग्रस्त कार्यपद्धती, 'व्हीआयपी' पासेससह अन्य सर्वच मार्गांनी मिळणारे आर्थिक उत्पन्न आणि भाविकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा पंचनामा केला जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडून याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. त्र्यंबकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर देवस्थान कारभाराच्या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात रविवारी (दि.१) सकाळी सुरक्षारक्षकांनी एका परप्रांतीय भाविकाला मारहाण करून त्याचे कपडे फाडले. हा भाविक मंदिराच्या गर्भगृहात दर्शनासाठी आला, तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला ढकलले. त्यावेळी सुरक्षारक्षकांशी झालेल्या वादातून हा प्रकार घडला.

त्याआधीही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली होती. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, देशभरात त्र्यंबकेश्वरची प्रतिमा मलीन होत आहे. शनिशिंगणापूरप्रमाणेच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. उपविभागीय अधिकारी जी. व्ही. एस. पवनदत्ता यांना चौकशी करून २१ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

चौकट

त्र्यंबकेश्वरमधून दिले जाणारे 'व्हीआयपी' पास, त्यातून निधी, दर्शनाच्या व्यवस्थेसह येथील आर्थिक बाबींची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाले. त्यानुसार कारभाराची चौकशी होईल. उपविभागीय अधिकारी चौकशी करून अहवाल सादर करतील.

आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande