
परभणी, 05 मार्च (हिं.स.)जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरत असतानाच प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी करत इंधनाच्या खुल्या विक्रीस सक्त मनाई केली आहे. पेट्रोलियम नियम 2002 मधील तरतुदीनुसार पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटली, कॅन किंवा अन्य अनधिकृत कंटेनरमध्ये भरून देणे नियमबाह्य आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ज्वलनशील पदार्थांच्या अनियंत्रित विक्रीमुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी जारी केले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी इंधन केवळ वाहनाच्या टाकीतच भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत खुले इंधन विक्री किंवा पुरवठा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे व विक्री नोंदी नियमित राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis