
कोल्हापूर, 05 मार्च (हिं.स.) : कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे भव्य स्मारक तसेच महाराजांच्या नावाने टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) उभारण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी दिल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आधुनिक कोल्हापूरचे जनक मानले जातात. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या अस्मितेचे प्रतीक ठरलेली छत्रपती शाहू मिल्स स्थापन करणे होय. कोल्हापूर केवळ शेतीवर अवलंबून न राहता औद्योगिकदृष्ट्या सक्षम व्हावे, सामान्य नागरिकांना माफक दरात दर्जेदार कापड उपलब्ध व्हावे तसेच स्थानिक व्यापार-उद्योगाला चालना मिळावी या उद्देशाने शाहू महाराजांनी या मिल्ससाठी स्वतःची जागा आणि आर्थिक पाठबळ दिले होते.
या ऐतिहासिक व पवित्र जागेत शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक आणि कापड उद्योगाशी संबंधित पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलच्या जागेवर प्रस्तावित स्मारकासाठी जागा हस्तांतरणाबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच कोल्हापूर आजही ‘रयतेची आणि शाहू महाराजांच्या विचारांची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मिल्सच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात शाहू महाराजांच्या विचारांना आणि कार्याला प्रेरणा देणारे स्मारक उभारणे गरजेचे आहे.
प्रस्तावित प्रकल्पामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास व जुनी यंत्रसामग्री दर्शविणारे शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपट महोत्सवांसाठी सुमारे 1000 ते 1200 आसनक्षमतेचे अत्याधुनिक ऑडिटोरियम, संगीत विद्यालय तसेच मिल्सलगत असलेल्या कोटीतीर्थ तलाव परिसराचे सुशोभीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने ॲम्युझमेंट पार्क उभारण्याचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीस प्रधान सचिव अनुष्का सिन्हा, नगरविकास विभागाच्या सुशीला पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण पवार, उपसचिव तुषार पवार, आयुक्त संजय दैने तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
-------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar