
परभणी, 05 मार्च (हिं.स.)। सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे उपक्रम प्रभावीपणे राबवून भूमाता इतकी समृद्ध करावी की बाह्य अन्नघटकांची आवश्यकता भासू नये, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन या विषयावर कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.
अध्यक्षीय भाषणाप्रसंगी कुलगुरु इंद्र मणि म्हणाले, गुजरातमध्ये राबविण्यात आलेल्या सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे व माफसू विद्यापीठाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येणार आहेत. मार्च 2026 महिन्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये टप्प्याटप्प्याने शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार असून, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करत हा उपक्रम अधिकाधिक शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवसारी कृषि विद्यापीठ (गुजरात) अंतर्गत एन. एम. कृषी महाविद्यालयातील कृषीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. के. ए. शाह उपस्थित होते. त्यांनी नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत पिकांच्या योग्य वाढ व विकासासाठी आवश्यक 17 अन्नद्रव्ये व त्यांचे स्रोत-शेणखत, कंपोस्ट, पिकांचे अवशेष, हिरवळीचे खत, वर्मी कंपोस्ट आदींबाबत माहिती दिली. नैसर्गिक पद्धतीने पोषक तत्त्वांची पूर्तता करून उत्पादन व गुणवत्ता वाढविण्याचे प्रभावी उपाय त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात शेतकरी व सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis