
लातूर, 05 मार्च (हिं.स.)।तपास यंत्रणेला आधुनिक बळ; लातूर पोलिस दलात चार नवीन अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल
महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या धोरणांतर्गत लातूर जिल्हा पोलीस दलाच्या तपास यंत्रणेला बळकटी देण्यासाठी जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्या आहेत. या व्हॅनमुळे गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेत वैज्ञानिक पद्धतींचा अधिक प्रभावी वापर करता येणार असून गुन्हे उघडकीस आणण्यास तसेच न्यायालयीन प्रक्रियेत सबळ पुरावे सादर करण्यास मोठी मदत होणार आहे.
यापूर्वी लातूर पोलीस दलाकडे तीन फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत होत्या. त्या माध्यमातून अनेक गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तेथील भौतिक पुरावे शास्त्रीय पद्धतीने गोळा करण्यात आले आहेत. घटनास्थळी उपलब्ध असलेले बोटांचे ठसे, रक्ताचे नमुने, शस्त्राचे अवशेष तसेच इतर विविध वैज्ञानिक नमुने संकलित करून त्यांचे योग्य प्रकारे जतन व विश्लेषण करण्यात येत असल्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळत आहे. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यात येत असून अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली आहे.
आता नव्याने दाखल झालेल्या चार फॉरेन्सिक व्हॅनमुळे जिल्ह्यातील कोणत्याही गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ पोहोचून वैज्ञानिक पद्धतीने तपास कार्यवाही करण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. घटनास्थळी मिळणारे सूक्ष्म पुरावे सुरक्षितरीत्या गोळा करून त्यांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्याची सुविधा या व्हॅनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्ह्याचा तपास अधिक अचूक, पारदर्शक आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुन्ह्यांच्या तपासात पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक वैज्ञानिक पद्धतींचा वापर वाढत आहे. यामुळे केवळ गुन्हे उघडकीस आणणेच नव्हे तर निर्दोष व्यक्तींवर अन्याय होऊ नये यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावली जाते. न्यायालयीन प्रक्रियेत वैज्ञानिक पुराव्यांना अधिक विश्वासार्हता असल्याने आरोपींना शिक्षा होण्याची शक्यता वाढते.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत लातूर जिल्हा पोलीस दल सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास कटिबद्ध आहे. नव्या फॉरेन्सिक व्हॅनमुळे जिल्ह्यातील तपास यंत्रणा अधिक सक्षम होणार असून गुन्हे उघडकीस आणण्याची गती व अचूकता वाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis