भरती प्रक्रियेत माणुसकीचा स्पर्श; उमेदवारांना चहा-नाश्ता व राहण्याची व्यवस्था
लातूर, 05 मार्च (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांसाठी माणुसकीची भावना उमजून विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. राज्यभरातून हजारो युवक या प्रक्रियेत सहभागी होत असून, त्यांच्यासाठी पोलीस प्रश
लातूर पोलीस


लातूर, 05 मार्च (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांसाठी माणुसकीची भावना उमजून विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. राज्यभरातून हजारो युवक या प्रक्रियेत सहभागी होत असून, त्यांच्यासाठी पोलीस प्रशासनाने राहण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच चहा-नाश्ता व अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भरती प्रभारी अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली विशेष नियोजन करण्यात आले. उमेदवारांसाठी पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत मैदानी चाचण्या घेण्याचे नियोजन केले असल्याने उष्णतेमुळे त्रास होऊ नये याची दक्षता घेतली गेली. यासाठी वैद्यकीय पथक आणि कार्डियाक ॲम्बुलन्स देखील सज्ज ठेवण्यात आली होती.

११ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान पोलीस शिपाई पदासाठी १०० मीटर व १६०० मीटर धावणे, गोळाफेक आणि इतर कौशल्य व शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. तसेच ४ मार्चपासून ७ मार्चपर्यंत चालक पोलीस शिपाई पदासाठी वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचण्या सुरू आहेत. या चाचणीत सकाळी उपाशीपोटी येणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीसांनी चहा-नाश्ता तसेच दुपारी अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोलीस भरती ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून युवकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. उमेदवारांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेकडे लक्ष देत लातूर पोलिसांनी केलेली ही व्यवस्था सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे. कायद्याची अंमलबजावणी करतानाच समाजाशी संवेदनशील नाते जपणाऱ्या लातूर पोलिस दलाची ही लोकाभिमुख कार्यपद्धती एक आदर्श उपक्रम मानला जात आहे.----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande