
कोल्हापूर, 05 मार्च (हिं.स.) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर रुपाराणी निकम यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आणि त्यांची अडचण थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आज आयोजित जनता दरबारात नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या आणि मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या व तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
जनता दरबाराच्या सुरुवातीस महापौरांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापौर म्हणाल्या, “नागरिकांचे प्रश्न थेट आमच्यापर्यंत यावेत आणि महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने ते लवकरात लवकर मार्गी लागावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. येणाऱ्या काळात बहुतेक तक्रारी १५ दिवसांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.”
या जनता दरबारात विविध विभागांचे एकूण 136 अर्ज प्राप्त झाले, ज्यात पर्यावरण विभागाशी 2, विद्युत 5, अतिक्रमण 5, आरोग्य विभागाशी 22, नगररचना विभागाशी 28, सामान्य प्रशासन विभागाशी 9, शहर अभियंता 23, पाणी पुरवठा 8, घरफाळा विभागाशी 7, इस्टेट विभागाशी 18, परवाना विभागाशी 3, उद्यान 4, पेन्शन विभागाशी 1 आणि विवाह नोंदणी विभागाशी 1 अर्ज दाखल झाले.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत मोकाशी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य लेखा वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्री, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar