रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी १२ मार्चचा मुहूर्त
रायगड, 05 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद येथे सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. नव्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार १२ मार्च रोज
रायगड जिल्हा परिष


रायगड, 05 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद येथे सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. नव्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार १२ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत नेमकी सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अलिबाग येथील नियोजन भवन अलिबाग येथील सभागृहात १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. त्याआधी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी दिल्यानंतर आवश्यक असल्यास मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. जिल्हा परिषदेत एकूण ५९ सदस्य असून सत्तास्थापनेसाठी ३० हा बहुमताचा आकडा आवश्यक आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे २१, भाजपचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, शिवसेना ठाकरे गटाचे ५ तर काँग्रेसचे २ सदस्य निवडून आले आहेत.

सध्याच्या राजकीय समीकरणानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास त्यांच्याकडे ३१ सदस्यांचे बहुमत होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. दरम्यान, या सत्तेत शिवसेनेला सहभागी करून घ्यायचे की नाही, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत नेमकी सत्ता कोणाची येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande