
परभणी, 05 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम - २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी योजना राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाने हरभरा पिकासाठी ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा आधारभूत दर निश्चित केला आहे. शेतकरी नोंदणी ३१ मार्च पर्यंत सुरू राहणार असून प्रत्यक्ष खरेदी पुढील ६० दिवस करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर, पुर्णा, मानवत, सोनपेठ, बोरी, परभणी, वरपुड व मिरखेल या ठिकाणी नियुक्त खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने पीओएस मशिनद्वारे करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा व पिकपेरा आदी कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर एसएमएस प्राप्त झाल्यावरच शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर हरभरा आणावा.
ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis